भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत दुखापतींचा सामना करत असलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत करण्यासह निव्वळ धावगती चांगली ठेवण्याचे आव्हान असेल. श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय नोंदवत भारताने उपांत्य फेरीत प्रवेशाच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र, पहिल्या लढतीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांनंतर सहा गुण असून त्यांची निव्वळ धावगती २.७८६ अशी आहे. ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. अन्य स्थानासाठी भारत, न्यूझीलंड व पाकिस्तान संघ शर्यतीत आहेत.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानला नमवले. मात्र, कर्णधार एलिसा हिलीला दुखापत झाली आणि वेगवान गोलंदाज टायला व्लाएमिकचा खांदाही दुखावला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध त्या खेळण्याबाबत साशंकता आहे. भारताने श्रीलंकेला ८२ धावांनी पराभूत केले. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. त्यामुळे भारताची निव्वळ धावगती चांगल्या स्थितीत पोहोचली. या कामगिरीनंतर भारतीय संघ ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया शीर्ष स्थानावर आहे. भारताचे चार गुण असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना विजय मिळवणे अनिवार्य आहे. न्यूझीलंड संघाला आणखी एक सामना खेळायचा आहे. त्यांनीही विजय मिळवल्यास त्यांचे सहा गुण होतील. असे झाल्यास निव्वळ धावगतीचा विचार होईल.
भारताची निव्वळ धावगती ०.५६७ आहे, तर न्यूझीलंडची ०.२८२ अशी आहे. पाकिस्तानचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत. अखेरच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केल्यास व भारतालाही पराभवाचा सामना करावा लागल्यास सर्व संघांचे चार गुण होतील आणि निव्वळ धावगती विचारात घेतली जाईल. भारताने ऑस्ट्रेलियासमोर नेहमीच आव्हान उपस्थित केले आहे. या निर्णायक सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरकडून संघाला सर्वाधिक अपेक्षा असतील. शफाली वर्मा, स्मृती मनधाना आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी गेल्या सामन्यात धावा केल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्जच्या कामगिरीवरही सर्वांचे असेल. शारजाच्या मैदानावर हा भारताचा पहिलाचा सामना आहे.
या खेळपट्टीवर धावा करणे सोपे नाही. गोलंदाजांनी पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली. या कामगिरीत त्यांना सातत्य राखावे लागेल. दुसरीकडे, हिली या सामन्यात न खेळल्यास ऑस्ट्रेलियाला नवीन कर्णधार, यष्टिरक्षक आणि सलामीची फलंदाज शोधावी लागेल. उपकर्णधार ताहलिया मॅकग्रावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते.