रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील दोन आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे, सगळीकडे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने, हळू हळू पूराचे पाणी ओसरल्याने जनजीवन पुर्वपदावर येत आहे.
परंतु, सातत्याने होणारी पर्जन्यवृष्टी आणि ओढवलेलं पुराचं संकट त्यामुळे अनेक रस्ते वाहून गेले, कित्येकांची धूप झाली, काही लाकडी साकव वाहून गेले, पावासाची संततधार सुरू झाल्याने, डोंगर सुद्धा ढासळू लागले आहेत. रस्त्यावरील सिमेंट, डांबर निघून जाऊन लहान रस्त्यापासून ते अनेक महामार्गाची अवस्था सुद्धा जीर्ण झाली आहे. तालुक्यातील भातशेतीसह खाजगी आणि शासकीय गोष्टींचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यांची कामे वेगवान गतीने करण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे भातशेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे, तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते खचले आहेत, काही ठिकाणी डोंगरावरची माती, खाडी सगळी रस्त्यावर आली आहे.
तालुक्यातील दुरुस्तीच्या रस्त्यांची आत्ता दिवसागणिक वाढत जात असून, या रस्त्यांच्या तूर्तास दुरुस्तीसाठी साधारण २ कोटी ७२ लाख तर कायमस्वरूपी दुरूस्तीसाठी २४ कोटी ५० लाख निधीची आवश्यकता आहे. कारण अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने, अनेक गावांशी, वाड्यांशी सुद्धा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून अपेक्षित असणाऱ्या निधीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. सध्याच्या पाठविलेल्या निधीच्या आकड्यामध्ये काही प्रमाणात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दिवसेंदिवस नैसर्गिक संकटे वाढतच चालली आहेत. सध्या तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांची संख्या ६७ वर पोहोचली आहे.