रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिसऱ्या संशयिताने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने सोमवारी न्यायालयाने तिसऱ्या संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला. माजी सभापती स्वप्नाली सावंत ३१ ऑगस्ट २०२२ पासून बेपत्ता झाल्याचा बनाव तिचा पती सुकांत ऊर्फ भाई सावंत यांनी केला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबरही दिली होती. पोलिस तपासात १ सप्टेंबरला मिऱ्या येथील घरामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी गळा आवळून तिचा खून केला होता. तसे मुख्य संशयित भाई सावंत याने पोलिस ठाण्यात कबूलही केले होते, मात्र या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याची राख आणि हाडे समुद्रात फेकल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी स्वप्नालीचा पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत व प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघांनाही अटक करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. या गंभीर गुन्ह्यातील संशयितांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. या प्रकरणातील तिसरा संशयित प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (रा. सडामिन्ऱ्या, रत्नागिरी) यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
सोमवारी (ता. २५) न्यायालयात या जामिन अनवर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फ सरकारी अभियोक्ता अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी युक्तीवाद केला. अखेर न्यायालयाने निकाल देताना या गंभीर गुन्ह्यातील साक्षीदार अल्पवयीन आहेत. त्यामुळे केसवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच मिळालेल्या मोबाईलची सीडीआर हा सरकारच्या बाजूने आहे त्यामुळे घटनाक्रम दिसून येतो. या कारणास्तव न्यायालयाने या प्रकरणातील तिसरा संशयित प्रमोद गावणंग याचा जामिन अर्ज फेटाळला.