तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत आज मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ मिळणार नसल्याने भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी टोकाचा निर्णय घेतला. तसे भावनिक आवाहन त्यांनी आजच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. मी पक्षाची ४० वर्षे सेवा केली. मी आता निघालो आहे. मला अन्य पक्ष स्वीकारायला तयार आहे. मी तुमच्यातून गेलो तरी परका वाटणार नाही, असे स्पष्ट करत उबाठा सेनेत जाण्याचे सूतोवाच त्यांनी केले. बाळ माने यांच्या भावनिक आवाहनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीत महायुतीचे पदाधिकारी विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर होते. तेव्हा भाजपला रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ जणांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच जागा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे गेली दोन वर्षे उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेत तालुका पिंजून काढणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने यांची घोर निराशा झाली. त्यांनी त्यानंतर आज तत्काळ तालुका कार्यकारिणीसह अन्य पदाधिकाऱ्यांची रत्नागिरी भाजप कार्यालयात तातडीची बैठक बोलावली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, सौ. वर्षा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, सतेज नलावडे, शहराध्यक्ष राजन फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. माने यांनी सर्वांना भावनिक आवाहन केले. रत्नागिरी-संगमेश्वर हा मतदारसंघ भाजपला मिळणार नसल्याने मला रत्नागिरीकरांच्या हिताकरिता अन्य पक्षात जावे लागत आहे. मी तुमच्यातून गेलो तरी परका वाटणार नाही, असे सांगितल्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. आम्ही तुमच्यासोबत असू, असा विश्वास माने यांना त्यांना दिला. माने यांच्या निर्णयामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
माने महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दसऱ्याला किंवा त्यानंतर लगेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाळ माने दसऱ्यालाच सीमोल्लंघन करून उबाठामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजते. यावेळी राजेश सावंत यांनी सांगितले की, ‘सोयीस्कररीत्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणाऱ्या नेत्यांना निवडून द्यायचे नाही, असे कार्यकत्यांच्या मनात आहे. सर्वच गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत. घोडेमैदान दूर नाही. कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्याला योग्य ते आदेश देतीलच.
आपण आपल्या बूथ कमिट्या सज्ज करूया. कार्यकत्यांच्या भावना मी जाणून घेतल्या आहेत. त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.’ सतेज नलावडे म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपचे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. रत्नागिरीत हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांना मतदान करायचे नाही, अशीच सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. अशा व्यक्तीला रत्नागिरीकर स्वीकारणार नाहीत. त्यामुळे विधानसभेतील अनुभवी व्यक्तीला निवडून देण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत.