भाजपने २०१९ मध्ये झोकून काम केले व उदय सामंत यांना निवडून आणले. २०२४ मध्ये पक्षाचा आदेश असेल तसे काम करणार. मला वाटले तर २८८ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी व्हावेत; पण राजकारणात अशा गोष्टी होत नाहीत. बाळासाहेब माझे भाऊ आहेत. ते आमदार व्हावेत, कोणत्या बहिणीला वाटेल तिकीट मिळू नये; पण राजकारणात सर्वच गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे होत नाहीत. प्रत्येकवेळी पदरात दान पडेल असं नाही. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत. बाळासाहेब देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलले असतील. ते आमचे आहेत, आमचे राहतील, असे प्रतिपादन आमदार चित्रा वाघ यांनी केले. राज्यपाल नियुक्त आमदार चित्रा वाघ यांनी आज पहिला दौरा रत्नागिरीत केला.
त्यांचे स्वागत महिला भाजप जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर भाजप जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत चित्रा वाघ म्हणाल्या, दोन दिवसांत जागा वाटप होईल, मनातल्या शंका दूर होतील. बाळासाहेबांबद्दल गैरसमज पसरवू नका. बाळ माने यांनाही लढण्याची इच्छा आहे, आमदार होण्याची इच्छा आहे. त्यांची इच्छा चुकीची नाही. आमचा भाजप पक्ष शिस्तीचा आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आम्हाला जो आदेश देतील त्याचे पालन आम्ही करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले. यावेळी बाळ माने, राजेश सावंत, शिल्पा मराठे, वर्षा ढेकणे, पल्लवी पाटील, प्राजक्ता रूमडे, नुपूरा मुळ्ये आदी उपस्थित होते.
आराखड्यासाठी सूचना पाठवा – प्रदेश भाजपाची निवडणुकीसाठी जाहीरनाम्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पक्षाने आता ‘अंमलबजावणी आराखडा’ करण्याचे निश्चित केले आहे. जनतेला काय वाटत आहे ते जनतेने सांगावे. असे आवाहन वाघ यांनी केले.