25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriखेडशीच्या सरपंचपदी बंडबे विजयी; शिवसैनिकांचा जल्लोष

खेडशीच्या सरपंचपदी बंडबे विजयी; शिवसैनिकांचा जल्लोष

जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला.

खेडशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वसंत उर्फ आबा सोमा बंडबे यांनी विजय मिळवला. त्यांना ९ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार प्रभारी सरपंच मानसी मंगेश पेडणेकर यांना ४ मते मिळाली. त्यांचा पराभव झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख बाबू म्हाप व त्यांच्या सहकाऱ्यांनी खेडशी ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील या मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता कायम ठेवत ठाकरे गटाला धोबीपछाड दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

खेडशी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकरं यांनी अडीच वर्षानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. या पदाचा कारभार प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच मानसी मंगेश पेडणेकर या पाहत होत्या. शुक्रवारी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक प्रशासनाने जाहीर केली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार रिध्दी गोरे यांनी काम पाहिले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून ज्येष्ठ सदस्य वसंत उर्फ आबा सोमा बंडबे हे सरपंचपदासाठी रिंगणात उतरले होते तर उबाठाकडून मानसी मंगेश पेडणेकर या रिंगणात होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत मतदान पार पडले.

यात ९ सदस्यांनी आबा बंडबे यांना मतदान केले तर मानसी पेडणेकर यांच्या पारड्यात ४ सदस्यांनी मते टाकली. ९ विरुध्द ४ अशा फरकाने आबा बंडबे विजयी झाल्याने शिवसेनेकडून एकच जल्लोष करण्यात आला. खेडशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी आनंद साजरा केला. यावेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, तालुका संघटक भिकाजी गावडे, विभागप्रमुख प्रकाश रसाळ, प्रवीण पवार, युवासेना विभागप्रमुख हर्षराज पाटील, उपविभागप्रमुख पिंट्या साळवी, रमेश कसबेकर, प्रथमेश पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले. यावेळी मोठ्या संख्येने खेडशी ग्रामस्थांनी उपस्थित राहून विजयाचा जल्लोष केला.

RELATED ARTICLES

Most Popular