आपण दोघे आई-बाबा होणार, अशी सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. आठ महिन्यांची गरोदर असताना पत्नीला ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यास आले. मुलानेही हे जग पाहिले नाही. मात्र, पत्नीच्या धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदने व तिची दृष्टी जगात कायम राहण्यासाठी पतीने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तिघांना जीवदान मिळाले. अवयव दान करणारी बांद्याची ही लेक सौ. सई परब अर्थात पूर्वाश्रमीची भावना महाले (वय ३४) ही. पहिलीच महिला असल्याने समस्त बांदावासीयाना ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
एकीकडे आपले बाळ या जगात नसल्याचे दुःख बाजूला सारून महाले-परब कुटुंबीय हे खऱ्या अथनि ‘त्या’ तिघांसाठी देवदूत बनले आहेत. मुंबईतील केईएम या महापालिकेच्या रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची ही पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार देखील पडली. तिच्या या अवयवरुपी दानाने अवयव दान चळवळ ही अधिक सक्षम व व्यापक होण्यासाठी मदत होऊ शकते. भावना मूळ बांदा-गडगेवाडी येथील. चार भावंडामध्ये तिसरी. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बांद्यात झाले. तर, ३ डिसेंबर २०१७ मध्ये पाट परुळे (ता. वेंगुर्ले) येथील दीपक परब यांच्याशी विवाह झाला. दोघेही नोकरीनिमित्त मुंबईला गेले. लग्नानंतर सात वर्षांनी त्यांच्या घरी बाळ येणार होते.
त्यामुळे कुटुंब आनंदात होते. सातव्या महिन्यांपर्यंत सर्व काही सुरळीत होते. यादरम्यान अचानक रक्तदाब वाढला म्हणून त्या पतीसह कल्याण येथील खासगी रुग्णालयात गेल्या. रक्तदाब उपचारानंतरही कमी झाला नाही. प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मुंबईतील जीवघेण्या वाहतूक कोंडीतून रुग्णालयात पोहोचण्यासाठी अडीच तासांहून अधिक काळ लागल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. रुग्णालयात केलेल्या चाचण्यांमधून काविळीचे निदान झाले.
त्यातच मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना व त्यांच्या नवजात बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र दोघेही वाचू शकले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित केले. उपचार सुरू असतानाच भावनाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी व हॉस्पिटल प्रशासनाने अवयव दान करण्याविषयी कुटुंबीयांचे समुपदेशन केले. अवयवदानाचा निर्णय दीपक यांच्यासाठी कठीण होता. त्यांनी दोन्ही कुटुंबीयांशी चर्चा करून धाडसी निर्णय घेतला. इतक्या दुःखद प्रसंगातही दीपक व त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या कोणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा निर्णय घेत चांगले उदाहरण घालून देणारा ठरला.