चिपळूणसह सावर्डे परिसर बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा बनला आहे. या परिसरातील बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात बांगलादेशींचा वावर असल्याचे पुढे येत आहे; मात्र, त्या दृष्टीने पोलिसांचा तपास ढीम्मच आहे. रत्नागिरी येथे एक बांगलादेशी महिला पोलिस चौकशीत सापडली. या महिलेने सावर्डेमधील तरुणाशी विवाह केल्याचे पुढे आले आहे. यावरून बांगलादेशींनी कशाप्रकारे ठिकठिकाणी घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. सावर्डेसह चिपळूणमध्ये यापूर्वी सात ते आठ बांगलादेशी सापडले होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर ही शोधमोहीम थंड झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे सावर्डे परिसरातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागात बिल्डिंग व्यवसाय जोमाने सुरू आहे. अनेक बिल्डर इमारत बांधकामासाठी बांगलादेशी कामगार आणत असावेत, अशी शक्यता वर्तवली जात होती. चिपळूण परिसरात एका बिल्डरकडे ३० ते ४० कामगार बांगलादेशी असावेत, अशी चर्चा परिसरात सुरू होती.
त्या वेळी झालेल्या पोलिस कारवाईत पाच ते सहाजणांवर कारवाई करण्यात आली व गुन्हा नोंदवण्यात आला. उर्वरित बांगलादेशी नेमके गेले कुणीकडे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बांधकाम व्यवसायात इमारतींचे सेंट्रिंग करण्याचे काम बांगलादेशी चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे अनेक बिल्डरांकडून या टोळ्या मागवण्यात येतात. चिपळूण परिसरात अशी टोळकी सक्रिय आहेत. त्याकडे पोलिसयंत्रणेची डोळेझाक होत आहे. काही लोकांचा अजूनही बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क सुरू असल्याचे आधीच्या पकडलेल्या घुसखोर बांगलादेशींकडून पुढे आले आहे. कमी खर्चात कामगार उपलब्ध होत असल्यामुळे सावर्डे, चिपळुणात काही बिल्डरांनी घुसखोर बांगलादेशींच्या टोळ्या आपल्याजवळ ठेवल्या आहेत. सेंट्रिंग करणे, स्लॅब टाकणे, प्लास्टर, लादी अशा छोट्या- मोठ्या कामांसाठी मजूर उपलब्ध होतो. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास अपुरा पडत आहे.