प्रतिकात्मक गांधी चक्क संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात अचानक अवतरल्याने स्थानकावरील उपस्थित रेल्वे कर्मचारी, प्रवाशी यांची उत्सुकता चाळवली गेली. हे कसले आंदोलन तर नाही ना? अशी कुजबुज लोकांमध्ये सुरु झाली आणि सर्वानी आपल्या नजरा या गांधीजींचे प्रतिकात्मक देहबोली असलेल्या किशोर वयातील मुलाकडे रोखल्या. गांधी वेशातील या मुलाने स्थानकात येताच थेट फलाट गाठले आणि मुबंईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत तो उभा राहिला. काही वेळातच मुंबईकडे जाणारी गाडी संगमेश्वर रोड स्थानकात आली आणि’ आपणास आता पुढचा प्रवास करता येईल या अपेक्षेने अन्य प्रवाश्यांसोबत बापू पुढे सरसावले. परंतु गाडीचा वेग काही कमी होताना दिसला नाही. अशातच बापूंनी गाडीला हात करून थांबण्याची विनंती सुध्दा केली परंतु गाडी सुसाट वेगाने न थांबता निघून गेली. निराश होत बापूनी आपला मोर्चा तडक स्थानकावरील स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयाकडे वळवला त्यावेळी उपस्थित लोकांना गांधीजींनी केलेल्या दांडी यात्रेची आठवण झाली.
बापूंनी स्टेशन मास्तर यांचेकडे तक्रार वही मागत संगमेश्वर स्थानकात अतिरिक्त गाड्या थांबवाव्यात व प्रवाश्यांची होणारी गैरसोय दुर करावी अशी तक्रार दाखल केली. काही पत्रकार बांधवाना याची कुणकुण लागताच त्यांनी संगमेश्वर रेल्वे स्टेशन गाठून बापूंना या प्रकाराविषयी अधिक विचारले असता ते म्हणाले की गेल्या अडीच वर्षांपासून भिजत असलेला मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा देण्याचा अद्याप या विषयावर कोणत्याही स्वरूपाचा निर्णय नाही. लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना, रेल्वे प्रवाशी ‘संघटना यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. हा अन्याय इथल्या सर्वसामान्य जनतेवर होतो आहे. या अन्यायाविरुद्ध हे अहिंसक आंदोलन मी संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून आज गांधी जयंतीचे औचित्य साधून करत आहे. या आंदोलनाची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने, रेल्वे बोर्डाने घ्यावी ही या निमित्ताने विनंती ! असे ‘बोलून आपले स्थानक स्वच्छ ठेवा असा संदेश देत बापू पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.