रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांचे काम सुरु आहेत. मागील वर्षी पडलेल्या खड्ड्यांचे डांबरीकरण आणि खड्डे भरण्याचे काम सुरु आहेत. काही ठिकाणी सुरु असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी पुलावर शनिवारी सकाळी सुमारे ७ वा. च्या दरम्यान तीन ट्रक आणि कारमध्ये झालेल्या विचित्र अपघातामुळे सुमारे ५ तास वाहतूक खोळंबली होती.
या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून एकजण जखमी झाला आहे. अमोल जगदीश केसरकर यांनी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ते महिंद्रा ट्रक तसेच जनार्दन जयवंत शेळके हे महिंद्रा ट्रक चालवत त्या ट्रकच्या मागून निवळी ते सातारा असे निघाले होते. त्याच वेळी मुंबईहून भरधाव वेगाने मारुती पाटील हा टाटा ट्रक घेऊन गोव्याच्या दिशेने निघाला होता.
बावनदीच्या ब्रिटिशकालीन पुलावर मध्यभागी ही सर्व वाहने आली असता, मारुती पाटील याचा ट्रकवरील ताबा अचानक सुटल्यामुळे ट्रकची धडक प्रथम जनार्दन शेळकेच्या ट्रकला जोरदार बसली. नंतर त्या पाठोपाठ येणार्या अमोल केसरकर याच्या ट्रकलाही त्याची धडक बसली. त्यामुळे केसरकर यांचा ट्रक मागे जाऊन थोडा तिरका झाला आणि पुलाच्या मधोमध येऊन पुलाचा कठडा या ट्रकच्या धडकेने तुटला. त्याच प्रमाणे केसरकर यांच्या ट्रकच्या मागून येणाऱ्या इर्टिगा कारलाही या ट्रकची धडक बसून नुकसान झाले. त्यामधील प्रवासी अर्शिया मणेर हि जखमी झाली आहे.
या अपघातात दैव बलवत्तर म्हणून एक ट्रकचालक बचावला. हा अपघात इतका भीषण आणि विचित्र होता की, एका ट्रकचा पुढील अर्धा भाग पुलावर लोंबकळत राहिला होता. पण नशिबाने त्या ट्रक चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले. पूल अरुंद असल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांचा मात्र खेळखंडोबा झाला. सुमारे सहा तासांनी वाहनांचा अडथळा दूर केल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरु झाली.