आयसीसीच्या टी-२० मालिकेसाठी अखेर हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी हार्दिक पंड्याने विशेष परिश्रम घेतले होते. आयर्लंड दौऱ्यामधील दोन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या करणार असल्याची माहिती बीसीसीआयनं बुधवारी दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघ महिन्याभराच्या काळानंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी होणाऱ्या टी-२० संघ बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, संजू सॅम्सन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग या खेळाडूंचा सामावेश असणार आहे.
दरम्यान, भारताचा तीनही फॉरमॅटमधील महत्वाचा ऑल राउंडर खेळाडू असलेल्या केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने तो इंग्लंड विरूद्धचा एकमेव कसोटी सामन्याला मुकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो अजून दुखापतीतून सावरलेला नसल्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिके पाठोपाठ इंग्लंड दौऱ्यातील कसोटीला आणि आयर्लंड दौऱ्यालाही मुकणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरोधात मायदेशी होणाऱ्या पाच टी-२० सामन्याच्या मालिकेला गुरुवारी ९ जूनपासून सुरुवात झाली आहे. पण त्यापूर्वीच केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाद झालेत. सध्या ऋषभ पंत भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे, तो इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे. पण पंतला आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्यानं या दौऱ्यात होणाऱ्या टी-२० च्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीनं घेतला आहे.