टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. दीपक हुडा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका सुरू होत आहे. हुडाच्या जागी शाहबाज अहमद तर पंड्याच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे.
या मालिकेतील पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत हार्दिकने चमकदार कामगिरी केली होती. त्याने ३ सामन्यात १९०.९० च्या स्ट्राइक रेटने १०५ धावा केल्या. विश्वचषक पाहता पांड्याला विश्रांती देण्यात आल्याचे मानले जात आहे. या मेगा टूर्नामेंटसाठी हार्दिकसारखे खेळाडू पूर्णपणे फ्रेश असले पाहिजे, असे संघ व्यवस्थापनाचे मत आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीही दक्षिण आफ्रिका मालिकेत संघाचा भाग असणार नाही. तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. अशा स्थितीत उमेश यादव त्याच्या जागी संघाचा भाग असेल.
दीपक हुडा दक्षिण आफ्रिका मालिकेचा भाग असणार नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे. हुड्डा विश्वचषकातही टीम इंडियाचा एक भाग आहे. अशा स्थितीत त्याच्या दुखापतीमुळे भारताचा तणाव वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी हुडाच्या जागी शाहबाजची निवड करण्यात आली आहे. हुड्डा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत एकही सामना खेळला नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ अशाप्रकारे आहे. रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर.

