मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण’ योजनेतील काही लाभार्थ्यांना अर्ज मंजूर झाल्याचे तर काहींना नामंजूर झाल्याचे मेसेज मोबाईलवर येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण आहे. अर्ज नामंजूर झालेले लाभार्थी त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयासह विविध केंद्रांवर चकरा मारत आहेत. नारीशक्ती अॅपसह पोर्टल कधी बंद पडते तर कधी संथगतीने सुरू राहते. त्यामुळे अर्ज भरला न जाण्याची घालमेल लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेत २१ ते ६५ वर्षापर्यंतच्या पात्र युवती व महिलांना राज्य शासनाकडून दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची दिवस-रात्र एक करत महिलांनी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. अर्जही भरण्यासाठी अंगणवाडीच्या पायऱ्याही झिजवल्या. सुरवातीला अॅप काम करत नसल्याने अनेक महिलांनी ऑफलाईन अर्ज भरले नंतर जसजसे अॅप चांगले चालत राहिले तसतसे महिलांचे अर्ज भरण्यात आले. त्यामुळे महिला आनंदात होत्या. ज्या महिलांचे अर्ज भरले गेले आहेत त्यांची सध्या प्रशासनाकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले. तपासणीत ज्या महिलांचे परिपूर्ण अर्ज आहेत त्यांना मंजुरी मिळत आहे.
त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता; परंतु ज्या अर्जाना नामंजुरी मिळाली त्या बहिणींच्या चेहऱ्यावर चिंता होती. जे अर्ज नामंजूर झालेले आहेत त्यांचे अर्ज दुरूस्त करून त्यातील त्रुटींची पूर्तता करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे अनेक महिला अर्ज भरणा केलेल्या केंद्रांवर दुरुस्तीसाठी गर्दी करत आहेत. नारीशक्ती अॅपला एरर असल्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे. वेळेत त्रुटींची पूर्तता झाली नाही तर योजनेच्या लाभापासून वंचित राहू, अशी भीती निर्माण झाली आहे.