काही मिनीटांमध्ये कर्ज देण्याच्या जाहीराती अॅप्स व्दारे केल्या जातात. त्याला बळी पडून अनेकजण कर्ज घेतात. ग्राहकांच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून फसवणूक केली जात आहे. समाजात बदनामी होण्याच्या भितीमुळे याबाबत तक्रार केली जात नाही. त्यामुळे अशा अॅप तयार करणाऱ्याचे फावते. बेकायदा कर्ज अॅप्सपासून सावध रहा. अशी फसवणूक झाली असल्यास सायबर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही मिनिटांत कर्ज मिळते, या आकर्षणाला बळी पडून अनेक नागरिक कर्ज अॅपच्या जाळ्यात अडकत आहेत. किरकोळ रकमेच्या गरजेपोटी आधार कार्ड, पॅन कार्डसंह अन्य गोपनीय माहिती अॅप डाउनलोड करताना दिली जाते. मात्र, याच निष्काळजीपणाचा गैरफायदा घेत अनेक कर्ज अॅप्स नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करीत आहेत.
कर्ज अॅप्स अवघ्या काही मिनिटांत पैसे देण्याचे आमिष दाखवतात. एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेतल्यानंतर दहा दिवस, पंधरा दिवस, किंवा महिन्याभरात परतफेड करण्याची अट असते. मात्र, प्रत्यक्षात या अॅपद्वारे अधिक व्याज, प्रक्रिया शुल्क आणि दंड आकारला जातो. काही वेळा नागरिक पैसे भरून मोकळे होतात. म ात्र, अनेक प्रकरणांत पैसे दिल्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी केली जाते. यासोबतच मोबाईलमधील संपर्क, फोटो किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून बदनामीची भीती दाखवली जाते. या मानसिक दबावामुळे अनेकजण आपले पैसे भरून सुटका करून घेतात. सायबर विभागाकडे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे काही गुन्हे नोंद आहेत. कर्ज अॅपच्या संदर्भातील तक्रारींचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी इतर तांत्रिक मार्गाने झालेल्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.
तक्रारी न झाल्याने अशा अॅप्सना आळा बसत नाही आणि नवीन ग्राहकांना फसवण्याचे प्रकार सुरूच राहतात, असे सायबर सेलच्या अधिकाऱ्यानी सांगितले. आपली फसवणूक होऊ नये यासाठी कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अॅप डाउनलोड करताना मोबाइलवरील संपर्क, फोटो, कॅमेरा यांसाठी परवानगी देताना विशेष खबरदारी घ्यावी. फेसबुक, जीमेल, व्हॉट्सअॅपवरून येणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवण्याआधी खात्री करावी. माहित नसलेले कर्ज अॅप मोबाइलम ध्ये डाउनलोड करू नयेत, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे. फसवणूक झाल्यास बदनामीची भीती न बाळगता थेट सायबर विभागाशी संपर्क साधावा तसेच जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. रीतसर अर्ज करून पुढील कायदेशीर कारवाईस सामोरे गेल्यासच अशा कर्ज अॅपच्या वाढत्या फसवणुकीला आळा घालता येईल. त्यासाठी जनजागृती गरजेची असल्याचे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी सांगितले.

