केंद्राच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं आज ‘भारत बंद’ ची हाक दिली असून, या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह, बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा पूर्णपणे दर्शविला आहे.
भारत बंदच्या हाकेला महाराष्ट्रभरातून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या आंदोलनामध्ये सहभाग दर्शवून विक्रोळीत भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तालुका अध्यक्ष अब्दुल अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली बिंदू माधव चौकात रस्ता रोको करत असताना पोलिसांनी सर्व आंदोलकांना बळाचा वापर करून बाजूला सारत नियंत्रण मिळवलं आहे.
पुण्यामध्ये सुद्धा मार्केटयार्ड परिसर पूर्णपणे बंद ठेवून, केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या आवारातील सर्व संघटनेच्या वतीनं आज मार्केटयार्ड बंद ठेवण्यात आलं आहे.
भारत बंदला भिवंडी, शहापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनीही पूर्ण पाठिंबा देत या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपसोबत, बहुजन विकास आघाडी, प्रहार संघटना यांनी आंदोलनात उपस्थित राहून सहभाग नोंदवला आहे.
मोठ्या शहरांसह लहान शहरांपर्यंत या बंदला पाठींबा देण्यात आला आहे. रत्नागिरी मधील चिपळूण तालुक्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे काळे कायदे आणले असून, देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून, तरुणाई नैराश्येच्या गर्त्यात बुडत चालली आहे. तसेच सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची जी हि कृत्रिम महागाई निर्माण केली गेली आहे. या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्वाना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.