भारजा नदीपात्रात साचलेला गाळ व अनावश्यक वाढलेली झुडपे हटवून नदीला पुनरुज्जीवन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली गाळउपसा मोहीम यंदाही प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पालघर येथे उर्वरित कामाचा प्रारंभ झाला. यामुळे नदीपात्र प्रवाही होणार असून, आसपासच्या गावांना टंचाईकाळात दिलासा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या प्रारंभी माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, सरपंच साक्षी खांडेकर, माजी उपसरपंच अल्पेश भोसले आदी उपस्थित होते. शासनाच्या माध्यमातून पालघर गाव व परिसरातील सुमारे तीन किलोमीटर अंतरातील भारजा नदीपात्रातील गाळउपसा व अतिरिक्त झुडपे काढून नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामामुळे नदीपात्र अधिक विस्तीर्ण झाले असून, पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेता नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती होत असून, नदीला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ग्रामस्थ सक्रियपणे सहभागी होत आहेत. नदी पूर्णतः प्रदूषणमुक्त व गाळमुक्त करण्यासाठी अशा मोहिमा अत्यावश्यक असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
६० किमी लांबीच्या नदीत गाळाची समस्या – भारजा नदी ही मंडणगड तालुक्यात सावित्री नदीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी असून, भोळवली येथे उगम पावून अनेक गावांतून प्रवास करत केळशी येथे अरबी समुद्रात विलीन होते. सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या या नदीच्या बहुतांश भागात गाळ व प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती.

