भूल भुलैया-२ या चित्रपटाला देखील अभूतपूर्व यश मिळाले असून, अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या मिळालेले यश साजरे करत आहे. रिलीजनंतर सात दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७६ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक नुकताच काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचला. कार्तिकसोबत चित्रपटाचे निर्माते भूषण कुमारही दिसून आले.
कार्तिकने गंगेच्या दशाश्वमेठ घाटावरील रोजच्या होणाऱ्या संध्याकाळच्या आरतीमध्ये देखील सहभाग घेतला. त्याच्या चाहत्यांची गर्दी रोखणे कठीण झाले म्हणून अभिनेत्याला पोलिसांनी आधी आरतीमध्ये सहभागी होण्यापासून रोखले होते. मात्र, नंतर त्यांना आरतीला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.
‘भूल भुलैया २’ रिलीज होण्यापूर्वी कार्तिक श्रीगणेशाचे आशिर्वाद घेण्यासाठी मुंबई प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. कार्तिकने मंदिराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये संस्कृतमध्ये गणपतीचा श्लोकही लिहिला होता. कार्तिक त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात आवर्जुन जातच असतो.
कार्तिक आर्यनने या चित्रपटात रुहान रंधावा उर्फ रूह बाबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कार्तिकशिवाय कियारा अडवाणी, तब्बू, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर १४.११ कोटी रुपयांची कमाई केली. या वर्षी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन सर्वाधिक होते. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी अलीकडेच चित्रपटाचे ५ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले असून ते ७६.२७ कोटी रुपये इतके आहे. या वीकेंडला हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो.