कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येऊ घातला आहे. अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून, त्यांनी नवा प्रकल्प कोकणात उभारण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी समुद्रकिनारी पाच हजार हेक्टर जागेची मागणी केली. सिंधुदुर्गात विजयदुर्ग किंवा रत्नागिरीत जयगड येथे ही जागा उपलब्ध करून देण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. त्यासाठी कंपनी ८० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती केली.
सध्या कोकणात विजयदुर्ग आणि जयगड बंदर (रत्नागिरी) रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा केंद्रीय दळणवळण विभागाचा प्रस्ताव आहे. याबाबतची घोषणा नितीन गडकरी यांनी पनवेल येथील कार्यक्रमात केली होती. त्यामुळे या कंपनीला विजयदुर्ग किंवा जयगड (रत्नागिरी) भागात जागा देण्याचा सरकारचा मानस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्त्वता मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एक नजर – 1)अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया प्रकल्प उभारणार 2)विजयदुर्ग आणि जयगड बंदर रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव 3) कंपनी करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक
कंपनी देणार पायाभूत सुविधा – अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. कंपनी आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणारी असून, कंपनीने कोविडमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. भारतात स्टील उत्पादन वाढीसाठी कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. खोपोली, तळेगाव, सार्ताडा (सिंधुदुर्ग) येथे कंपनीत हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे. कंपनी शिक्षण, आरोग्य, विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्येही काम करणार असल्याचे सांगितले.