कांदळवन निसर्ग पर्यटनाला राज्यातील पर्यटकांकडून पहिली पसंती मिळत असल्याने पावस येथील महिलांनी एकत्र येऊन गौतमी कांदळवन निसर्ग पर्यटन केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून गौतमी खाडी किनाऱ्यावरील कांदवळवनातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळत आहे. पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास यांसह पाण्यातून फिरण्याचा आनंद घेण्यासाठी आतापर्यंत तीन महिन्यांत सुमारे १५०हून अधिक पर्यटकांनी गौतमी खाडीतील पर्यटन केंद्राला भेट दिली. महिलांनी एकत्रित येऊन चालविलेला हा प्रकल्प आहे. सध्या पर्यटकांचा ओढा धार्मिक स्थळाबरोबर समुद्रकिनारा, किल्ले पाहण्याकडे असतो. याबरोबरच कांदळवन निसर्ग पर्यटनाकडेही पर्यटकांची पावले वळत आहेत. यामुळेच कांदळवन प्रतिष्ठानच्या गौतमी कांदळवन निसर्ग पर्यटन केंद्राला अनेक जण भेट देऊन बोटीतून सफर करण्याचा आनंद घेत आहेत. पावस येथील समाधी मंदिराला भेट देणारे अनेक जण या केंद्राकडे येतात. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलाच पर्यटकांना कांदळवन सफारी घडवून आणतात.
पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास आणि कांदळवनाची सफर या महिला घडवत आहेत. याला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागातील अनेक पुरुषमंडळी मासेमारी करतात. त्यांनी आणलेले मासे विक्री करण्याचे काम महिला करतात; मात्र आता खाडीकिनारी बोटीच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना बोटसफारी करण्यासाठीही महिला सरसावल्या आहेत. या महिला पर्यटकांना माहिती देण्याचे काम करत आहेत. दहा महिलांचा गट असून, टप्प्याटप्प्याने त्या पर्यटकांना बोट सफारी करून आणतात. येथील निसर्ग पर्यटन केंद्राच्या प्रमुख सुरेखा पावसकर म्हणाल्या, गौतमी कांदळवन निसर्ग पर्यटन केंद्राचे उद्घाटन वर्षांपूर्वी झाले; परंतु प्रत्यक्षात कामाची जुळवाजुळव करून या कामाला सुरुवात झाली. गेल्या तीन महिन्यात याला गती मिळाली आहे. आतापर्यंत दीडशे लोकांनी प्रत्यक्ष सफरीचा अनुभव घेतला. भविष्यात याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
दहा महिलांचा गट चालवतो केंद्र – गौतमी कांदळवन निसर्ग पर्यटन केंद्र हे दहा महिलांचा गट चालवतात. यामध्ये पक्षी व प्राणी निरीक्षण याविषयी माहिती दिली जाते. तसेच कांदळवनातील झाडांची माहिती, वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांची शास्त्रीय नावे व त्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. ही बोटसफर भरतीवर अवलंबून आहे. पावस भाटीवाडी येथील बंधाऱ्याजवळ बोट लावली जाते. गौतमी कांदळवन निसर्ग पर्यटन करण्यासाठी पावसचौकापासून प्रत्येक ठिकाणी मार्गाकडे जाण्यासाठी सूचनाफलक लावण्यात आले आहेत.