रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीतील बहुप्रतिक्षित तिढा अखेर सुटला असून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार लढणार आहे. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली असून शुक्रवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. महायुतीची उमेदवारी जाहीर होताच रत्नागिरी-सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अर्ज दाखल करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. नारायण राणे यांनी आनंद व्यक्त केला. महायुतीत या मतदारसंघावरुन कोणताही तिढा नव्हता. उमेदवारी मिळणार याची माहिती होती. प्रचाराला आधीच सुरुवात केली होती. महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करावयाचे आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे न जात आहोत. ‘अब की बार चारसो पार’ करायचे आहे. विकास हाच प्रचाराचा – प्रमुख मुद्दा असेल, असे ना. नारायण राणे यांनी सांगितले.
आभारी आहे – उमदेवारी दिल्याबद्दल मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमच्या पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमितभाई शहा आणि महाराष्ट्रांचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे. सामंतदेखील सोबत आहेत. आमचा विजय नक्की आहे. अडीच लाख मतांच्या फरकाने महायुतीचा उमेदवार म्हणून मी या मतदारसंघातून निवडून येईन, असे ना. नारायण राणे यांनी सांगितले.
फेविकॉल का जोड – उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, किरण सामंत हे नाराज नाहीत. महायुतीत कोणतीही नाराजी नाही. राणे आणि सामंत हा फेविकॉल का जोड असून या निवडणुकीत तो दिसून येईल, असे आ. नितेश राणे म्हणाले माजी खासदार निलेश राणे यांनीदेखील आनंद व्यक्त केला.
गोव्याचे मुख्यमंत्री, पाव डझन मंत्री आणि आमदारांची उपस्थिती – उमेदवारी अर्ज दाखल करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पाव डझन मंत्री, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
मतदारसंघात फटाके फुटले – गेले अनेक दिवस या मतदारसंघाबाबत भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार? याविषयी कुतूहल होते. या मतदारसंघांत निर्माण झालेला तिढा हा राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. गुरुवारी सकाळी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करताच हा बहुप्रतिक्षित तिढा सुटला आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
आज अर्ज भरणार – या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (१९ एप्रिल) हा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नारायण राणे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाईल. दरम्यान रत्नागिरीत महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची जय्यत तयारी केली आहे.
महायुतीचे सर्व नेते येणार – महायुतीचे उमेदवार म्हणून ना. नारायण राणे हे शुक्रवारी वाजत गाजत अर्ज दाखल करणार असून यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणारu आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, सावंतवाडीचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत, “कणकवली-देवगडचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण, खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यासह माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार बाळ म ाने यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजेश सावंत, माजी अध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.