राज्यात कोरोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक दहीहंडी स्पर्धा किंवा साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भित मंडळांशी ऑनलाईन बैठक घेऊन, चर्चेअंती निर्णय दिला आहे कि, यंदाच्या वर्षी सुद्धा दहीहंडी साजरी करण्यास बंदी जाहीर केली आहे. राज्यातील निर्बंधामध्ये शिथिलता मिळाल्यावर, लोक सार्वजनिक ठिकाणी प्रचंड प्रमाणात करत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जनतेला केले आहे. शाळा कॉलेजची शैक्षणिक वर्षे सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
परंतु, दहीहंडी बंदी कार्यक्रमाला भाजपने कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक हिंदू सणाच्या वेळेलाच सर्व नियमावली बाहेर पडतात. बियर बार, दारुचे ठेले महसुलासाठी सुरु केले जातात आणि हिंदू धर्माचे सण मात्र कायम निर्बंधात. स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन काय करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, आम्ही सण साजरे करणारच असं म्हणत राम कदम त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला नियम आखून परवानगी दिली तर त्याचे स्वागतच करू, अन् नाही दिली तरी आम्ही श्रीकृष्ण जन्माचा सोहळा दहीहंडी साजरी करणारच ! ते म्हणाले होते की, निर्बंध, नियम घालून द्या, पण उत्सव सरसकट रद्द करु नका. आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची भाषा हिंदू बांधवांनाच का? इतर धर्मियांच्या सणांना परवानगी मिळते, मग हिंदुच्या सणांना का नाही! असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.