माजी आमदार आणि भाजपचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळ माने यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थान स्मारकाला भेट देऊन पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. लोकमान्यांच्या स्मृतिदिनानिमित्त टिळकांना अभिवादन करून भाजपने विजयाचे रणशिंग फुंकले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांतून केंद्र, राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी माजी आमदार माने सक्रिय झाले आहेत. टिळक आळीतील स्मारकात आज सकाळी १० वाजता बाळ माने व पदाधिकारी यांनी अभिवादनासाठी आले होते.
त्यांनी जन्मस्थानाची पाहणी करून लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. याप्रसंगी पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थीसुद्धा लोकमान्यांना अभिवादन करण्यास आले होते. त्यावेळी बालदोस्तांनी माजी आमदार बाळ माने यांच्यासोबत फोटो काढून घेतला. देशाचे भविष्य असणाऱ्या या पिढीला लोकमान्यांचे जीवनकार्य समजावून सांगत बाळासाहेब माने यांनी राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. या वेळी बाळ माने यांच्यासमवेत प्रशांत डिंगणकर, राजू तोडणकर, सचिन करमरकर, राजन फाळके, सौ. सुप्रिया रसाळ, संदीप रसाळ, सुजाता साळवी, विक्रम जैन, राजू भाटलेकर, गुरु शिवलकर, भाई जठार, डॉ. हृषिकेश केळकर, अॅड. अनिश पटवर्धन, मुन्ना चवंडे, श्री. आयरे, श्री. जाधव, राजन फाळके, दादा ढेकणे यांच्यासमवेत भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळ माने यांचा जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. मध्यंतरी ते तितकेसे सक्रीय नव्हते. मात्र अलिकडे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे अभियान सुरु आहे. त्यामाध्यमातून माने पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहे.
कार्यकर्त्यांत उत्साह – ९ वर्षे पूर्ण झालेल्या केंद्रातील मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार व भाजपला पुन्हा विजयी करण्यासाठी टिफिन बैठक, सत्कार, सभा, योजनांची माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांसह तळागाळात भेटीगाठी घेत असल्याचे बाळासाहेब माने यांनी सांगितले. बाळ माने पुन्हा सक्रिय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.