महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल, अशी नवी भविष्यवाणी केलीय.
नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले कि, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असलेले सर्व बदल दिसतील. माझ्या आतमध्ये जी गोष्ट दडून आहे, ती मला आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवलेल्याच बऱ्या. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.” असे ते म्हणाले.
आगामी वर्षात राज्यातील निवडणुका होणार आहेत. अशातच राज्यात मार्च अखेर पर्यंत भाजपाचं सरकार बनू शकतं. अशा प्रकारचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. आता जे काही चाललंय ते सर्व सुरळीत होईल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आपले सर्व प्रकारच्या कार्यक्रम सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत मुंबईतून दिल्लीला रवाना झाले आहेत.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावल्याने, त्यासाठीच शरद पवार दिल्लीला रवाना झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे भाजपाचे नेते दिल्लीत गेल्याची चर्चा होत आहे.