मुंबईमधील बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप आणि मनसे यांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन वर्षात कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची कोणतीही जाहीर राजकीय सभा घेतली नव्हती.
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडे या सभेच्या आयोजन आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यांनी या पूर्वीच ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल असे सांगितले आहे. या सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यासह राज्याच्या कारभारावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सडेतोड उत्तर देतील, असंही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. एमएमआरडीए मैदानात एकूण दीड लाख लोक बसण्याची क्षमता आहे. शिवसेनेने केवळ मुंबई शहर आणि परिसरातील शिवसैनिकांना या रॅलीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित सभेत राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला आवाहन केले होते. राज ठाकरे यांनी पुणे आणि औरंगाबाद येथील सभांमध्येही भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या सर्व आरोपांना उद्याच्या रॅलीतून उद्धव ठाकरे योग्य ते उत्तर देतील, असं शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे.
त्याचप्रमाणे गेले काही दिवस भाजप ने शिवसेनेच्या विविध नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा गंभीर आरोपही भाजपने वेळोवेळी केला आहे. शिवाय अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना केलेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.