महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा म्हटल्या की, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धडकी भरणे स्वाभाविक असते; मात्र, यंदा ही भीती दूर करण्यासाठी कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव प्रयोग राबवला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय मार्गदर्शन व्हिडिओ मालिका प्रसिद्ध केली आहे. साधारणपणे परीक्षेच्या काळात खासगी क्लासेसचे मार्गदर्शन शोधले जाते; मात्र, कोणताही व्यावसायिक स्पर्श न ठेवता खुद्द बोडनिच तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने हे ‘डिजिटल शस्त्र’ उपलब्ध करून दिले आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यालयात या सर्व व्हिडिओंचे चित्रीकरण झाले असून, ते एसएससी, एचएससी डिव्हिजनल बोर्ड, कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
केवळ पाठांतर करून चालत नाही तर परीक्षेच्या ठराविक वेळेत ते ज्ञान कागदावर कसे उतरवायचे याचे कौशल्य महत्त्वाचे असते. या मालिकेचा मुख्य भर ‘अचूक लेखन’ आणि ‘वेळेचे नियोजन’ यावर आहे. गणितातील पायऱ्या, भाषेतील शुद्धलेखन, विज्ञानातील नामनिर्देशित आकृत्या आणि भूगोलातील नकाशापूर्ती याचे सूक्ष्म मार्गदर्शन यामध्ये आहेत. शेवटची १० मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कशी वाचवावीत आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, याचे सूत्र तज्ज्ञांनी उलगडले आहे. रिल्सच्या जमान्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता लक्षात घेऊन हे व्हिडिओ १० ते १५ मिनिटांचेच ठेवण्यात आले आहेत. कोकण विभाग निकालात नेहमीच राज्यात अव्वल असतो; मात्र, केवळ टक्केवारी न वाढवता निकालाचा दर्जा सुधारण्यासाठी मंडळाने वर्षभर उपक्रम राबवले आहेत.
‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या नियोजन पुस्तिकेसह ‘कॉपीमुक्तीची शपथ’, ऑनलाईन बैठका आणि परीक्षेच्या काळातील आहार-आरोग्याविषयीच्या टिप्सचाही यात समावेश आहे. विभागीय मंडळाने दहावीच्या ८ आणि बारावीच्या १३ महत्त्वाच्या विषयांचे व्हिडिओ तयार केले आहेत. यामध्ये भाषा विषयांसह गणित, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि वाणिज्य शाखेच्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर हे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी ‘लास्ट मिनीट रिव्हिजन’चे काम करत आहेत

