पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील ९० टक्के बोटी बंदरात स्थिरावल्या आहेत. १ जून पासून मच्छीमारीला बंदी असल्यामुळे मच्छीमारांकडून आवरते घेण्यास सुरुवात झाली आहे. किनाऱ्यावर आणलेल्या बोटीतील साहित्य काढून त्या साफ करत आहेत. बोटीतील जाळी सुकविण्यासाठी टेम्पोतून पाठविण्यात येत आहेत. बंदी कालावधी जवळ येत आहे, तशी मच्छीमारांची धावपळ वाढत आहे. बंदी कालावधी सुरू होण्यापूर्वी नौका बंदरात आणा, अशी सक्त ताकीद प्रशासनाने मच्छीमारांना दिल्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
किनाऱ्यावरही सुखी मासळी सुकविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसामुळे त्यात व्यत्यय आला होता. सुकविलेली मच्छी पॅकिंगसाठी पाठविली जात आहे. अलीकडे सुकी मच्छी पॅकिंग करून किलो-पावकिलोच्या दराने मिळते. त्याचा फायदा ग्राहक उठवत आहेत. त्यामध्ये बोंबील, सुरमई, वाकट्या, कोलीम, सुकी मास्ट चांगल्या प्रतिची बाजारात मिळत आहेत. जून महिना तोंडावर आल्याने शहराजवळच्या मिरकरवाडा, काळबादेवी, कासारवेली, साखरतर, कर्ला या ठिकाणी किनाऱ्यावर आणलेल्या बोटींच्या कामाला सुरुवात झाली आहे.
किरकोळ काम करुन घेतली जात आहे. पूर्वी लाकडाच्या बोटी तयार करण्यात येत होत्या. सध्या त्यावर फायबरचा मुलामा येत असल्यामुळे बोटी चांगल्या टिकत आहेत. मात्र जाळ्यांची डागडुजी करावी लागत आहे. पावसाळ्यात मच्छीमार बांधव काम कमी करत असल्यामुळे ताफ्या ताफ्याने जाळी दुरुस्त करत आहेत. त्यासाठी त्यांनी रोजगारही हजार ते बाराशे रुपयांपर्यत मिळत असतो. मिरकरवाडा येथील अनेक मंडळी एकत्र बसून ही जाळी विणण्याचे काम करत असतात.