मागील आठवडाभर वातावरणाने साथ दिल्यामुळे मच्छीमारांना बांगडा, व्हाईट चिंगूळ, चालू चिंगूळ मिळत होते. काहींच्या जाळ्यात पापलेट सापडल्यामुळे मच्छीमार सुखावले; परंतु गेले दोन दिवस किनारी भागात वातावरण बदलल्यामुळे समुद्रही खवळला आहे. त्यामुळे गिलनेट मासेमारी ठप्प झाली आहे. ट्रॉलिंगने मासेमारी करणाऱ्या मोजक्याच नौका समुद्रात गेल्या असल्या तरीही मासे मिळत नसल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
पश्चिम बंगालमध्ये वादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसू लागला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र वारा आणि पाऊस सुरू आहे. बदलत्या वातावरणामुळे मासे खोल समुद्रात गेले आहेत. याचा परिणाम मच्छीमारीवर झालेला आहे. गिलनेटद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार सुरक्षेच्या कारणास्तव बंदरातच थांबलेले आहेत. त्याचबरोबर ट्रॉलिंगसह फिशिंग मासेमारी करणारे काही मच्छीमार समुद्रात धोका पत्करून मासेमारीसाठी गेले होते; परंतु ते निराशंच झालेले आहेत.
मागील आठवडाभर गिलेटने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना १० ते १५ जाळी (१ जाळ्यात ३२ किलो मासळी) मासे मिळत होते. त्यामध्ये बांगडा, व्हाईट चिंगूळ, चालू चिंगळं, टायनीचा (छोटी चिंगळे) समावेश होता. मोठ्या चिंगळांना किलोला ३५० रुपये दर मिळत आहे. बांगडा १२० ते १४० रुपये किलोने विकला गेला. छोट्या आकाराची कोळंबी १२० रुपये किलोने विकली गेली. गतवर्षीपेक्षा ५० रुपये किलोला अधिक दर मिळत होता. काही मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट मिळाल्याने दिलासा मिळाला होता. जाळीला १० ते १२ किलो पापलेट मिळाले. किलोला ४०० रुपये दर मिळाला होता. हवामानातील बदलाचा परिणाम २७ पर्यंत राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.