मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता पर्यावरण मंत्रालयानं परबांचा रिसॉर्ट बेकायदा असल्याचं ठरवलं, असून, यासंबंधीचे पैसे कसे आले, यासंबंधी आता आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार असून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सोमय्यानी केली आहे.
मुरुड येथे सीआरझेड कायद्याचा भंग करून १० हून अधिक रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या समुद्र किनाऱ्या लगतच्या सीआरझेड झोनमधील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आता या रिसॉर्टचे मालक सरकारी नोटिसला काय उत्तर देतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाने मुरुड येथील साई रिसॉर्टला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याने एक प्रकारे खळबळ उडाली आहे. यामुळे या रिसॉर्ट लगतच्या अन्य हॉटेल व्यावसायिकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, साई रिसॉर्टला देण्यात आलेली नोटीस ही मी केलेल्या तक्रारीवरूनच केली जात असलेली कारवाई असल्याचा ठोस दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून केला आहे.
याबाबत बोलताना परब म्हणाले कि, मुरुड येथील साई रिसॉर्ट आपल्या मालकीचे नाही. सदरची जागा आपण सदानंद कदम यांना विकलेली असून, किरीट सोमय्या हे केवळ आपली आणि सरकारची बदनामी करत असून आपण त्यांच्या विरोधात १ कोटीचा बदनामीचा खटला ठोकला असून, एकतर सोमय्या यांनी आपली बिनशर्थ माफी मागावी किंवा १ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.