बारसू -सोलगाव पंचक्रोशीत रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण काम सुरू केले आहे. या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने जमाव बंदी आदेश दिले असून ४५ आंदोलकांना तालुका, जिल्हा बंदी नोटिसा बजावल्या आहेत.काल पोलिसांना चकवा देत कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष अशोक वालम यांनी बारसू सड्यावर जाऊन काम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आंदोलक यांच्यात बैठक घेऊन पर्यावरणतज्ञ यांच्या समवेत गुरवारी बैठक घेण्याचे निश्चित केले. प्रशासना बरोबर चर्चा सुरू असली तरी आंदोलन मागे घेण्यात आले नव्हते. रात्री सुमारे ६०० आंदोलकांनी सड्यावर मुक्काम केला होता.

राज्यात उमटले पडसाद – बारसू – सोलगाव रिफायनरी माती सर्वेक्षणाला होणारा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने जमाव बंदी, आंदोलकांना तडीपार बजावलेल्या नोटिसा डावलून आंदोलकांनी सड्यावर ठाण मांडून माती सर्वेक्षणाला विरोध केला. प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून आंदोलनकर्त्या ११० महिलांना ताब्यात घेऊन प्रसार माध्यमांना वृत्तांकन करण्यात अटकाव केला. पोलिसांच्या दडपशाहीचे पडसाद राज्यात उमटले. काल सकाळी साडे आठ वाजता बारसू सड्यावर माती सर्वेक्षण करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा जात असताना आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन राजापुरात आणले होते. रात्री उशिरा त्यांना कोर्टासमोर उभे केले. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. रात्री उशिरा जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना घरी परतण्याची अडचण झाली होती.त्या बद्दल आंदोलनकर्त्या महिलांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी सोडले.

ठाकरे सेनेचा आंदोलकांना पाठिंबा – बारसू – सोलगाव पंचक्रोशीत सरकारने प्रशासनाच्या मदतीने रिफायनरी आंदोलकांवर केलेल्या कारवाईची माहिती स्थानिक खा. विनायक राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन दिली. त्यानंतर शिवसेनेने रिफायनरी विरोधी आंदोलनास पाठिंबा दिला. शिवसेना ठाकरे गटाने रिफायनरी विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्यांनी जिल्हा पोलीस प्रशासन सावध झाले. बारसू -सोलगाव पंचक्रोशीत लागू झालेला मनाई आदेशाच कारण देत खा. विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख कमलाकर कदम यांच्यासह काही पदाधिकारी यांना नोटिसा पाठवून वातावरण बिघडू नये अशी समज दिली आहे.

खा. राऊतांचा ताफा रोखला – जिल्हा प्रशासनाने जमाव बंदीची बजावलेली नोटीस धुडकावत – आंदोलकांना भेटण्यासाठी निघालेल्या खा. विनायक राऊत यांची गाडी राजापूर तालुक्यातील रानतळे येथील चेकपोस्टवर पोलिसांनी अडवली. मात्र, आपण माझ्या मतदारांना भेटण्यास जाणारच अशी भूमिका घेत जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधला. शेवटी त्यांना जाण्यास मुभा दिली.

अखेर दोन गाड्या सोडल्या – राजापूर तालुक्यातील रानतळे चेकपोस्टवर खा, विनायक राऊत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण आहेत असं विचारून कुडाळचे आ. वैभव नाईक गाडीतून उतरून विचारू लागले. त्यावेळी स्थानिक खासदार असल्याने आपणच जाऊ शकता असे उपस्थित पोलिसांनी सांगितले. मात्र, आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो आहे असं खा. विनायक राऊत यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या. गाडीसह दोन गाड्या सोडण्याच पोलिसांनी मान्य केले. खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हा प्रमुख विलास चाळके, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, चंद्रकांत नकाशे, तालुका प्रमुख कमलाकर कदम यांच्या समवेत बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांच्या भेटीला निघून गेले.

आ. साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा – रिफायनरी प्रकल्पाला जनतेचा विरोध असल्याने शिवसेना ठाकरे गटाने रिफायनरी विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक खा. विनायक राऊत आंदोलकांच्या भेटीला निघाले असताना शिवसेना स्थानिक आमदार राजन साळवी यांनी बेरोजगारीचा मुद्दा पुढे करुन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. स्थानिकांशी प्रशासनाने संवाद साधून त्यांचा गैरसमज दूर करावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

आंदोलकांच्यात संभ्रम – बारसू – सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरी विरोधी आंदोलनास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. त्यानतर शिवसेना नेते आम्ही आंदोलकांसोबत असल्याचे सागून स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी आंदोलकांची भेट घेऊन समर्थन दिले. मात्र, स्थानिक आमदार राजन साळवी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाची आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांची भूमिका परस्पर असल्याने रिफायनरी विरोधी आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

‘त्या’ ग्रामस्थांना नोटिसा – मंगळवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आंदोलक यांच्याशी चर्चा करून गुरुवारी पर्यावरण तज्ञ यांची बैठक घेऊन संवाद साधण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला होता. गुरुवारी रिफायनरी विरोधी आंदोलकांच्या १० प्रतिनिधी यांच्या बरोबर चर्चा करण्याचे निश्चित केले होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणी आडवा आला तरी रिफायनरी प्रकल्प बारसू येथेच करणार अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर ११ आंदोलकांना चर्चे साठी बोलावल होतं त्यांना आपण या पुढे कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये अशी नोटीस प्रशासनाने बजावल्या आहेत.

‘पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण’ – बारसू सड्यावर प्रशासनाने बारसू – सोलगाव रिफायनरीसाठी माती सर्वेक्षणाची जागा बारसू सड्यावर करण्याचा आदेश काढला. माती सर्वे क्षणाला होणारा विरोध लक्षात घेऊन तालुका प्रशासनाने जमाव बंदी आणि आंदोलकांना तालुका जिल्हा बंदी नोटिसा पाठवल्या. मात्र, प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसाना न जुमानता आंदोलकांनी सड्यावर रविवार दि. २३ पासून ठाण मांडला. आंदोलकांचा विरोध धुडकावून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ज्या ठिकाणी माती सर्वेक्षण सुरू आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात असल्याने आंदोलकांना माती सर्वेक्षण थांबवता येत नाही.

आंदोलकांची कोंडी – बारसू सड्यावर रविवार पासून सूमारे ६०० आंदोलकांनी ठाण मांडले आहे. आंदोलकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टॅकरची सोय करण्यात आली. पहिल्या दिवशी पाणीपुरवठा करण्यासाठी गेलेल्या टॅकरच्या मालकाला पोलिसांनी दमदाटी करुन पुन्हा पाणीपुरवठा करु नये असे सांगितले. तसेच आंदोलकांना जेवण देण्यात येते त्यालाही अटकाव केला आहे.

गुरुवारच्या बैठकीकडे लक्ष – प्रशासनाच्या वतीने सुरु असलेले माती सर्वेक्षण थांबवण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. उलट शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे त्याना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितल्या प्रमाणे उद्या पर्यावरण तज्ञांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत काय निर्णय होणार यावरच आंदोलनाची धग समजणार आहे.

माध्यमांना बंदी कायम – मंगळवारी सकाळी ८.३० वाजता पोलिसांचा ताफा बारसू सड्यावर आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माध्यम प्रतिनिधी यांनी आंदोलक महिलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग पोलिसांना आल्याने त्यांनी प्रसार माध्यमांना माती सर्वेक्षण परिसरात मनाई केली. या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना बंदी नसल्याचे सांगितले. परंतु बुधवारीही या परिसरात माध्यमांना बंदी होती.