श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून रत्नागिरी रिक्षा सुंदरी अशी अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धा रविवारी दिनांक ३० एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. रिक्षा व्यवसायावर अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह होतो. काही चालक रिक्षाला खूप चांगल्या पध्दतीने जपतात. अशा रिक्षा चालक मालकांसाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार साळवी आणि सदस्य बाबय भाटकर यांनी सांगितले. ही स्पर्धा रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कल येथील हॉटेल वायंगणकर शेजारी असलेला पार्किंगच्या जागेत आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये दोन गट निश्चित केले असून पहिला गट २०१९ ते २०२३ या कालावधीमधील रिक्षा आणि दुसऱ्या गटामध्ये २०१९ पूर्वीच्या सर्व रिक्षांना सहभागी होता येईल. या रिक्षा सौदर्य स्पर्धेतील विजेत्यांना २१,०००/-, ११,०००/-, ८००१/- आणि ५००१/- रुपये रोख रक्कम, आकर्षक चषक आणि मानाचा फेटा देऊन गौरविले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरीसह कोल्हापूर, बेळगाव, सातारा, कराड, पुणे आणि मुंबई इत्यादी शहरांमधून आकर्षक सजविलेल्या रिक्षा सहभागी होणार आहेत. यावेळी दोन चाकांवर रिक्षा चालवणे, रिव्हर्स गिअरमध्ये रिक्षा चालवणे यासारखी चित्तथरारक प्रात्यक्षिकेही दाखवण्यात येणार आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि उद्योजक किरणशेठ सामंत यांच्याहस्ते विजेत्या रिक्षा चालकांचा सन्मान केला जाईल. तसेच प्रामाणिक आणि ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कारही केला जाणार आहे.

रत्नागिरी रिक्षा सुंदरी या स्पर्धे दरम्यान धमाल मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये सुप्रसिध्द अभिनेता विनोदवीर अंशुमन विचारे, सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातील गायिका ईशानी पाटणकर आपल्या वाद्यवृंदा सहित प्रेक्षकांचे निखळ मनोरजन करतील. रत्नागिरीमध्ये रिक्षा चालकांची संख्या अधिक आहे. यामध्ये तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या मालक- चालकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ११ वाजता रिक्षा चालकांनी उपस्थित रहावयाचे आहे. रिक्षाच्या टपावर नेत्याचे फोटो किंवा पोस्टर लावू नयेत तसेच परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल, असे तुषार साळवी यांनी सांगितले. विविध सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या तुषार साळवी आणि श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी रिक्षा व्यावसायिकांसाठी ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त रिक्षा व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.