भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस हिने कमालीची एकाग्रता दाखवत शानदार खेळ केला आणि पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ब्राँझपदक जिंकले. पात्रता फेरीत सातवा क्रमांक मिळवत तिने अंतिम फेरी गाठली होती. स्वरूप उन्हाळकरला मात्र आपला ठसा उमटवता आला नाही. २५ वर्षीय रुबिना पात्रता फेरीत बहुतांश वेळी पहिल्या आठ स्पर्धकांत नव्हती; परंतु अंतिम क्षणी आपला खेळ उंचावत तिने अंतिम फेरी गाठत पदकाची आशा कायम ठेवली. अंतिम फेरी गाठणाऱ्या आठ स्पर्धकांत रुबिना सातवी आली.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेतही तिने अंतिम फेरी गाठली होती; मात्र त्यावेळेस तिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामन्यात रुबिनाने ९७.६ गुणांची कमाई केली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या तुर्कस्तानच्या आयसेल ओझगान हिने सर्वाधिक ९९.५ गुणांची कमाई केली तर रौप्यपदक मिळवणाऱ्या इराणच्या सारेह जावनमारदी हिला ९८.३ गुण मिळाले. पात्रता फेरीत पहिल्या १० शॉट्समध्ये रुबिना १४व्या स्थानावर होती; मात्र त्यानंतर पुढच्या प्रत्येक शॉट्सनंतर तिने प्रगती केली. अखेर पहिल्या आठ स्पर्धकांत रुबिनाने ५५६ गुणांची कमाई केली.
जसपाल राणांची आणखी एक शिष्या – ऑलिंपिक स्पर्धेत दोन ब्राँझपदके मिळवणाऱ्या मनू भाकर हिचे वैयक्तिक प्रशिक्षक असलेल्या जसपाल राणा यांची रुबिना फान्सिसही शिष्या आहे. मध्य प्रदेशची रुबिना अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आली. जन्मापासून तिच्या पायांमध्ये दोष होता. मॅकेनिक असलेले तिचे वडील सायन फ्रान्सिस आपल्या मुलीचे नेमबाजीत असलेले स्वप्न पूर्ण करताना दमछाक होत होती. गगन नारंग यांनी ऑलिंपिकमध्ये मिळवलेल्या यशापासून स्फूर्ती मिळवणाऱ्या रुबिनाने २०१५ पासून नेमबाजीची आवड जोपासली. वडिलांनी पैशांची जमवाजमव केली आणि २०१७ मध्ये तिला गगन नारंग यांच्या पुण्यातील गन फॉर ग्लॉरी या अकादमीत प्रवेश मिळवून दिला.
तेथे जयप्रसा नौतियल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर जसपाल राणा यांनी रुबिनामध्ये असलेल्या गुणवत्तेला पैलू पाडले. २०१८ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रुबिना सहभागी झाली होती आणि तेथूनच तिने पॅरालिंपिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न बाळगले. मुख्य प्रशिक्षक सुभाष राणा यांच्या मार्गदर्शनाखाली रुबिनाचा खेळ उंचावत गेला. त्यानंतर तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत अनेक पदके मिळवली. यादरम्यान तिने विश्वविक्रमही केले.