रत्नागिरी शहरातील रस्ते, गटारे आणि पदपथांवरील अनधिकृत टपऱ्या, दुकाने आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्याची जोरदार पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात कोकणनगर भागातून होणार असल्याचे नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतची नोटीस नुकतीच पालिकेकडून काढण्यात आली आहे. कोकणनगर परिसर हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसरापासून काही अंतरावर विमानतळ, तटरक्षक दल आणि मिरजोळे एमआयडीसी आहे. रत्नागिरी विमानतळ लवकरच व्यावसायिक सेवेसाठी सज्ज होत आहे. विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली वीज वाहिनी जाणार जमिनीखालून टाकली आहे. मात्र, रस्त्याच्या बाजुपट्टीवर अनधिकृत बांधकामे आहेत. पालिकेने जाहीर केलेल्या नोटीसीनुसार, ज्या नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांवर, गटारांवर किंवा पदपथांवर अतिक्रमणे केली आहेत, त्यांनी ती १७ जानेवारीपर्यंत स्वतःहून काढून घेणे बंधनकारक आहे.
अनेक इमारतींमधील दुकानदारांनी सोडलेल्या मोकळ्या जागेत पत्र्याची शेड मारून तिथे साहित्य ठेवले आहे किंवा ती जागा भाड्याने दिली आहे. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी असलेल्या गटारांवर उभारलेली अनधिकृत खोकी मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणारे हातगाडी आणि टपऱ्या शहराच्या विकासासाठी आणि विमानतळ सुविधेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी रस्ते मोकळे असणे आवश्यक आहे. व्यावसायिकांनी सहकार्य करून स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा रत्नागिरी पालिकेकडून देण्यात आला आहे. १७ जानेवारीची मुदत संपल्यानंतर बंदोबस्तात ही मोहीम राबवण्याची शक्यता आहे.
बंदोबस्तात होणार कारवाई ? – मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणारे हातगाडी आणि टपऱ्या. शहराच्या विकासासाठी आणि विमानतळ सुविधेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी रस्ते मोकळे असणे आवश्यक आहे. रत्यावरील गटारे, पदपथावर ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटावची मोहीम राबवण्याची प्रशासनाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

