महामार्गावर घडणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक वेळा भरधाव वेगाने वाहन चालवणारे चालक पादचार्यांना धडक देऊन तिथून पलायन करतात. त्यामुळे नाहक अज्ञात पादचाऱ्याचा बळी अनेकदा जातो. अशीच घटना जिल्ह्यात एका ठिकाणी घडली आहे.
देवरूख-संगमेश्वर मार्गावरील बुरंबी येथे इको कारने पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने पादचारी जागीच गतप्राण झाल्याची घटना बुधवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र धडक देऊन इको चालक मदतीला न थांबता तेथून वाहन घेऊन फरारी झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही अंतरावर ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला परंतु, तो निसटला. त्यामुळे पुढे संगमेश्वर येथे पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. श्रीराम बारका भुरवणे, बुरंबी गेल्येवाडी असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
श्रीराम भुरवणे यांची देवरूख पंचायत समिती समोर वडापावची गाडी आहे. बुधवार २३ नोव्हेंबर रोजी ते काम आटोपून सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. दरम्यान बुरंबी येथे गाडीतून उतरून ते गेल्येवाडी कडे चालत जात असताना देवरूख हून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या इको कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत भुरवणे हे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत इको कार चालक तेथून फरार झाला होता. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. संगमेश्वर येथे माहिती देण्यात आली आणि ग्रामस्थ मागून पाठलाग करत होते. अखेर संगमेश्वर येथे त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून भुरवणे यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. इको चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.