एसटी महामंडळाच्या संपामुळे सध्या सगळीजण खाजगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. रोज मुंबई, पुणे, अशा ठिकाणी रात्री ट्ँव्हल्सच्या गाड्या सुटतात. काल सिंधुदुर्गमध्ये पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनीष ट्ँव्हल्स गाडीने अचानक पेट घेतल्याने त्यात ती संपूर्ण जळून खाक झाली आहे. पहाटे ४ वा.च्या सुमारास ही घटना वैभववाडी तालुक्यातील एडगांव घाडीवाडी नजीक घडली आहे. चालत्या बसने पेट घेतल्याने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली. या ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी बालबाल बचावले आहेत.
एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मनीष ट्रॅव्हल्स (क्र. जीए ०३/डब्लू २५१८ ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली असता बसमधून अचानक आगीचे लोट बाहेर पडायला लागले. काही कळायच्या आताच संपूर्ण बसने पेट घेतला.
चालकाच्या हि गोष्ट लक्षात येताच चालकाने ताबडतोब बस थांबवली. दरम्यान बसमधील प्रवासी झटपट खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळच्या लोळ गगनास भिडायला लागले. बसने मोठा पेट घेतला, सदरच्या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात धडकताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली.
दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला व आग विझवण्यात आली. या घटनेनंतर एडगाव परिसरात रस्त्याच्या दुतर्फ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता अडकलेली वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.