सध्या नवरात्रीचे दिवस सुरु असुन सगळीकडे देवींचे आगमन झाले आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी दांडिया, गरबा, रास अशा विविध प्रकारचे नृत्य प्रकार देखील खेळले जातात. राज्यात दांडिया खेळण्यासाठी ठराविक वेळेच बंधन आखून दिलेलं आहे. तरीही काही ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी लावून नृत्य केले जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे होणाऱ्या वादामुळे सणाला गालबोट लागते.
दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे गरबा नृत्य खेळण्यावरुन कोळी, खारवी समाजात जागेवरून वाद उफाळून आल्याची घटना घडली आहे. या वादानंतर कोळी समाजातील महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून, दोन्ही समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी गरबा खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे मोठा बाका वादाचा प्रसंग टळला.
बुरोंडी गावातील कोळी, खारवी या दोन समाजात मंदिरासमोरील पारंपरिक जागेतील दांडिया खेळाच्या नाचण्यावरून गेली २६ वर्षापासून वाद सुरु आहे. वर्षोनुवर्षे सुरु असलेल्या वादामुळे प्रांताधिकारी यांनी या ठिकाणी नाचण्याची परवानगीच रद्द केली. मात्र, २८ सप्टेंबर रोजी कोळी बांधव गरबा खेळत असताना खारवी समाजाने त्याबाबत हरकत घेतली. त्यानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी कोळी बांधवांचे गरबा साहित्य जप्त केले. तर काहींवर गुन्हे सुद्धा दाखल केले.
त्यामुळे संतप्त कोळी समाजातील ग्रामस्थ कार्यालयावर धडकले. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रांत अधिकारी शरद पवार यांनी दोन्ही समाजातील शिष्टमंडळाची चर्चा करून वादावर तोडगा काढला. त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही समाजाचे समाधान झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ परत निघून गेले. प्रांताधिकाऱ्यांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे दोन समाजातील दांडियाच्या जागेचा वाद संपुष्टात आला.