वार्ताहर तालुक्यातील पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले बुरोंडी बंदर आज विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. नेहमी ताजे आणि दर्जेदार मासे मिळणारे बंदर म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या या बंदरावर सध्या सुमारे २०० हून अधिक पारंपरिक मासेमारी बोटी अवलंबून आहेत. मात्र, मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे येथील मच्छिमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बुरोंडी बंदर हे जिल्ह्यातील सर्वांत जुने बंदर मानले जाते. येथील मासेमारी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केली जाते. पहाटे समुद्रात गेलेल्या बोटी सकाळीच मासेमारी करून परत येतात. त्यामुळे या बंदरात मिळणारे मासे बर्फात साठवलेले नसून पूर्णतः ताजे असतात. एका दिवसाची मासेमारी करून ताजे मासे विक्री करणारे असे बंदर आज अन्यत्र दुर्मिळ झाले आहे. या बंदरात डोमा, मांदेली, बघा, कांटा, बिल्जे, बांगडा, बोंबिल, कोळंबी यांसारखे छोटे, चविष्ट आणि दर्जेदार मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. मोठ्या माशांची मासेमारी येथे केली जात नाही, हीच या बंदराची खासियत आहे.
मात्र, बुरोंडी बंदरात मच्छी लिलावाची व्यवस्था नसल्याने पकडलेली मच्छी विक्रीसाठी मच्छिम ारांना हर्णे बंदरात न्यावी लागते. तेथे नेल्यानंतरही योग्य दर मिळेलच याची खात्री नसते. अनेक वेळा वाहतुकीचा खर्चही निघत नाही. मासे पोहोचण्यास लागणारा वेळ आणि वाहन उपलब्धतेवरच दर अवलंबून राहतो. बंदरात जेटी नसल्याने मासेमारीनंतर बोटी ओढत किनाऱ्यावर आणाव्या लागतात, यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. व्यापारी मंडळीही बंदरातील दुरवस्थेमुळे येथे येण्यास टाळाटाळ करतात. बर्फ, कोल्ड स्टोअरेज आणि मच्छी खरेदी-विक्री केंद्र नसल्यामुळे मोठ्या व महागड्या माशांची मासेमारी करणे शक्य होत नाही. वादळी परिस्थितीत बोटी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसल्याने अनेक वेळा बोटी खडकांवर आदळून फुटतात. यापूर्वी फयान वादळाच्या काळात एकाच कुटुंबातील तीन मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आजही मच्छिमारांच्या मनात भीती निर्माण करते.

