रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते आणि त्यांची दुरावस्था सर्वज्ञात आहे. काही वेळेला वेगाने दुचाकी चालवून , ओव्हरटेक मारून घाईत पुढे जाण्याच्या प्रकारामुळे भीषण अपघात घडून येतात. मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर परिसरामध्ये गुरुवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारचा अपघात घडला आहे. एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार गाडीसकट एसटीखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ओढवला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव शुभम सुधीर पाटील असे असून तो चिपळूण तालुक्यातील पेढे येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.
महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवरुख एसटी डेपोचे चालक समीर चंद्रकांत बने हे आपल्या ताब्यातील साखरपा-विरार अर्नाळा ही बस घेऊन विरारकडे निघाले होते. रात्री १०.४५ च्या सुमारास त्यांची गाडी नातूनगर येथे आली असता, मागून दुचाकीवरून येणाऱ्या शुभम पाटील यांने या एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रयत्नामध्ये शुभम याचा दुचाकी वरील ताबा सुटल्याने दुचाकी एसटीवर धडकली आणि शुभम हा दुचाकीसह बसखाली गेला आणि अपघातात एवढा गंभीर होता कि, जखमी झालेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला.
ऐन दिवाळीच्या दिवशीच शुभम याचे अपघाती निधन झाल्याने पेढे गावावर शोककळा पसरली आहे. महामार्गावर घडलेल्या अपघाताची खबर मिळताच, महामार्ग पोलीस कशेडी टॅपचे पोलीस उपनिरीक्षक चांदणे हे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळच घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर झालेल्या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबलेली होती. दूरदूर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतुक काही कालावधीमध्ये सुरळीत करून दिली. या अपघातामध्ये जागीच मृत्यू ओढवलेल्या शुभम याचा मृत्यदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.