विकासासाठी मला जनतेने निवडून दिले आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न मी करणार आहे. रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रिफायनरी प्रकल्पही मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करणार आहे असे केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मला पाडण्यासाठी स्वकीय, आप्त व युतीतील काही सहकारी यांनी प्रयत्न केले. मात्र विधानसभा लवकरच येतेय. विधानसभा निवडणुकीत त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल असा सूचक इशारा ना. नारायण राणे यांनी दिला आहे. मतमोजणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मिडिया हाऊसमध्ये विजयी उमेदवार ना. नारायण राणे यांची पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. निवडणुकी दरम्यान त्यांचे नेते आले. आमच्यावर आरोप केले. काय त्यांची भाषा आणि काय त्यांची टीका. विरोधकांची वैचारिक पातळीच खालावली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. विजयाचे श्रेय सर्वांना ते पुढे म्हणाले की, माझा विजय झालाय. फार आनंद वाटतोय. या विजयाचे श्रेय पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आहे. माझी जबाबदारी वाढली आहे. येत्या पाच वर्षात अपेक्षित विकासकामे या मतदारसंघातील जनतेला पहायला मिळतील. यावेळी बोलताना त्यांनी युतीतील काही नेत्यांना नाव न घेता सूचक इशारा दिला.
ते म्हणाले की, आता विधानसभा आहे. ज्यांनी दगाफटका दिला त्यांची दखल या विधानसभेला नक्कीच घेतली जाईल. मला पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. महामार्गासाठी प्रयत्न मी कोणाचाही विरोध जुमानत नाही. या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी रिफायनरी प्रकल्प आणण्याचा मी प्रयत्न करेन. पहिल्याप्रथम महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. महामार्गात आता कोणी आडवे आले तर आडवा करून पुढे जाईन असे सांगून त्यांनी बोलता बोलताच एक स्मितहास्य केले.