राज्याचे पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत बारसू-गोवळ-धोपेश्वरमध्ये चाचपणी होत असलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरी रिफायनरी कंपनीचे सीईओ बी.अशोक तसेच उद्योग विभाग व राज्य शासनाच्या सचिव पातळीवर सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी पेट्रोलियम मंत्रालयात प्रकल्पाच्या अनुषंगाने नवी दिल्लीत जाऊन चर्चा केलेली आहे. लवकरच केंद्रीय पथक जागा पाहणीसाठी राजापुरात येईल त्यानंतर आपण दौरा करू अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी दिली.
राजापूर तालुक्यातील बारसू-गोवळ-धोपेश्वरमध्ये प्रस्तावित केलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत सध्या राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यातील प्रक्रिया वेगाने सुरु आहे. ठाकरे सरकारमधील पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी सोमवारच्या मालवणच्या दौऱ्यात रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मकतेने विचार केला जात असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान राजापूर तालुका आणि कोकणच्या औद्योगिक विकासासाठी आग्रही असलेल्या ओम चैतन्य ट्रस्ट तसेच अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांची शिवनेरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी ना. देसाई यांनी या पदाधिकाऱ्यांशी प्रदिर्घकाळ चर्चा करून माहिती घेतली तसेच वरिष्ठ स्तरावर सुरू असलेल्या वेगवान घडामोडींची माहिती दिली. यावेळी शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेचीच काही मंडळी प्रकल्पाबाबत एनजीओंच्या जोडीने प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये सातत्याने गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली.
शिवसेनेचा बारसू-गोवळमध्येही प्रकल्पाला विरोध असल्याची ही मंडळी पिकवत असल्याचे यावेळी ना.देसाई यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी ना.देसाई यांनी भूमिका विषद केली. मी देखील शिवसेनेचा एक वरिष्ठ नेता आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाबाबत सर्वकंष विचार करूनच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. याचा मी पुनरूच्चार करीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना यापेक्षा वेगळे संकेत कशासाठी असा सवाल केला.