चिपळूण विधानसभा मतदारसंघात महायुतीसमोर महाविकास आघाडीच्या आव्हानापेक्षा महायुतीतील मित्रपक्षाची डोकेदुखी अधिक आहे. एकाच मतदारसंघात दोन तगडे नेते असल्याने कटकटी वाढणार आहेत. शेखर निकम विद्यमान आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता. या वेळी आघाडी कायम राहिल्यास शेखर निकम हेच २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील, अशी शक्यता आहे; परंतु सदानंद चव्हाण यांनी येथून मीच निवडणूक लढवणार, असे जाहीर केले आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर सदानंद चव्हाण यांनी ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चिपळूणमध्ये सक्षम उमेदवार हवा होता. सदानंद चव्हाण त्यासाठी पर्याय ठरले असते. त्यामुळे चव्हाण यांनी राजकीय भवितव्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. सत्तेच्या माध्यमातून चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पदावर नसतानाही चव्हाण यांना सत्तेमुळे चांगले महत्त्व आले होते; मात्र वर्षानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चिपळूणचे शेखर निकम यांचाही समावेश झाला.
त्यामुळे पूर्वी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असलेले शेखर निकम आता सिटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यानुसार महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चव्हाण यांना शेखर निकम यांच्या प्रचारात उतरावे लागेल; परंतु चव्हाण यांनी महायुतीमध्ये चिपळूणची जागा शिवसेनेच्या वाट्यात असल्यामुळे येथून मीच निवडणूक लढवणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे शेखर निकम यांच्यासमोर सदानंद चव्हाण यांचे अंतर्गत आव्हान असणार आहे.