चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, कुणबी सेना आदी पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने येणार आहेत. चिपळूण व संगमेश्वर तालुक्यात विभागलेल्या चिपळूण विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटप झालेले नाही; मात्र या ठिकाणी जवळजवळ उमेदवार निश्चित झालेले आहेत. सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात आहे.
२०१९ च्या विधानसभा दोनवेळा निवडणुकीत आमदार असलेल्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे विजयी झाले. मागील पाच वर्षांत अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यामुळे शिवसेनेत शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) असे दोन गट पडले. त्यामुळे साहजिकच मतदारसंघातील माजी आमदार सदानंद चव्हाण हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले तर माजी आमदार रवींद्र माने, सुभाष बने, माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेंद्र महाडिक, संतोष थेराडे यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले.
मतदारसंघातील विद्यमान आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणे पसंत केले. माजी आमदार रमेश कदम, बारक्याशेठ बने हे शरद पवार यांची साथ न सोडता राष्ट्रवादी शरद पवार गटात राहिले. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राहिलेले प्रशांत यादव यांनी विधानसभेच्या जागेवर डोळा ठेवून तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश मिळवला.
मागील महिन्यात आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिपळुणात आणून भव्य सभा घेऊन आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले तर लगेच दोन दिवसांनी प्रशांत यादव यांनी शरद पवार यांची जंगी सभा घेऊन या मतदार संघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम हे निश्चित मानले जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.