विद्यार्थीनीला मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या रत्नागिरीच्या एसटी बसस्थानकासमोरील प्रसिध्द महिला विद्यालयाच्या (जांभेकर विद्यालय) शिक्षकाविरोधात अखेर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. आर. भारदे असे या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाविरोधात आता कोणती कारवाई होणार याकडे सर्व पालकांचे लक्ष लागून राहीले आहे. जांभेकर विद्यालयात चार दिवसांपुर्वी जे काही घडले ते प्रसारमध्यमांमधून चव्हाट्यावर येताच साऱ्या रत्नागिरीत संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थीनींशी नको ती थेरं करणाऱ्या एका शिक्षकाचे प्रकरण धगधगत असतानाच ‘आणखी एका शिक्षकाविरूध्द काही विद्यार्थीनींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी काही पालक, विद्यार्थीनींसमवेत काही सामाजिक कार्यकर्ते शाळेत आले होते. आपल्याला झालेल्या त्रासाविरोधात आवाज उठवत एका विद्यार्थीनीने धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतली आहे. तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ती परीक्षेकरीता लागणारी कागदपत्रे जमा करण्याकरीता गॅली असता शाळेतील इयत्ता पाचवीचे वर्ग शिक्षक एस. आर. भारदे रा. उद्यमनगर रत्नागिरी यांनी तिला त्यांचे माझ्याकड एक महत्वाचे काम आहे, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना व्हॉटसअॅपवर मॅसेज करण्यास सांगितले. त्यांचे आपल्याकडे काहीतरी काम असेल म्हणून तिनेही त्यांच्या व्हॉटसअॅप मोबाईल नंबरवर मॅसेज केला. त्यांनी सांगितले की त्यांचे युट्युबवर चॅनेल आहे, त्याम ध्ये काम करशील का? तू मला पाहिजे तशी आहेस, असाही मेसेज पाठवला. त्यावर तिने मी त्यांना घरी विचारुन सांगते, असे सांगितले. यावर त्यांनी तू घरी विचारण्याअगोदर मला एकदा भेट असे सांगितले. त्यावर तिने त्यांना कुठे भेटू असे विचारले असता त्यांनी जिकडे कोणी नसेल आपण दोघे असू अशी जागा असेल तिकडे भेटू अस सांगितले.
विद्यार्थीनीने त्यांना आपण शाळेत भेटू, असे सांगितले. तर त्यांनी शाळेत माझे यु ट्युब चॅनेल आहे हे कोणाला माहित नाही. हा विषय तुझ्यात आणि माझ्यातच ठेव, असे सांगितले व अशी कोणती जागा आहे का? ते सांग असे म्हणाले. त्यावर तिने त्याना मला असे भेटता येणार नाही मला अशी जागा माहित नाही, असे सांगितले. यावर शिक्षकाने तिला लॉजवर भेटशील का असे विचारले असता तिने त्यांना नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांनी तू माझ्यासोबत आऊट ऑफ रत्नागिरी येशील का? असा मॅसेज केला. तिनै त्यांना नाही सांगितले. त्यावर त्यांनी त्यांची चार चाकी गाडी आहे. त्यामध्ये आपण भेटू, असा मॅसेज केला. मी अनुसुचित जाती जमातीची आहे हे माहित असतानाही त्यांनी मला विनाकारण भेटण्यासाठी येण्याबाबत वारवार मॅसेज करुन त्रास देऊन माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे या तक्रारीत म्हटले आहे.
या विद्यार्थीनींने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहिता ७५, ७८ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदासह पास्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.