7 कलमी कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्याबाबतचे मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आले. यामाध्यमातून समितीमार्फत विविध महाविद्यालयातून 272 प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकाऱ्यांनी दिली. पाटपन्हाळे हायस्कूल गुहागर 49 प्रस्ताव, डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण 25 प्रस्ताव, गोविंदरावजी निकम कॉलेज, सावर्डे 83 प्रस्ताव, चंदूलाल शेठ कनिष्ठ महाविद्यालय, खेड 19 प्रस्ताव, ए. जे. हायस्कूल दापोली 75 प्रस्ताव, गोगटे महाविद्यालय रत्नागिरी 20 प्रस्ताव असे एकूण 272 प्रस्ताव स्विकारण्यात आले. उर्वरीत महाविद्यालयांकडूनही अर्ज स्विकारण्याची मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. एकही मागसवर्गीय विद्यार्थी शैक्षणिक प्रवेश घेण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी समिती कार्यालयामर्फत प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे. समिती कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमास पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे महासंचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (मराठा) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी करावी लागते. बारावी विज्ञाननंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माण विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांस राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी, तसेच प्रवेश घेतल्यानंतर सरकारच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जातप्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केला नाही, त्यांनी सीसीव्हीआयएस किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत व त्याची छापील प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात दाखल करावी.