शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक केल्याने त्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. रस्त्यात ठाण मांडून बसणारी ही मोकाट गुरे आता शहरातील रहाटाघर बसस्थानक, शहरातील हॉटेल, दुकानांच्या रिकाम्या जागेमध्ये बसून व्यावसायिकांनाही हैरण करून सोडले आहे. एकीकडे शहराची वाटचाल स्मार्ट सीटीच्यादृष्टीने सुरू आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडत असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. असे असताना मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे या उद्देशाला गालबोट लागत आहे. परंतु, यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न जटिल होत चालाला आहे. शहरात कुठेही गेले, तरी तिथे मोकाट गुरे दिसतात. रस्त्यात ठाण मांडून वाहतुकीला मोकाट गुरे अडथळा करत आहेत, उधळून अचानक रस्त्यामध्ये त्यांच्या झुंडी येऊन अपघात घडत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांच्या रिकाम्या जागेत ही गुरे ठाण मांडून घाण करून जातात.
व्यापारी दुकान उघडण्यास आले की, प्रथम त्यांना गुरांना हाकलावे लागते. त्यानंतर तो परिसर साफ करावा लागतो. शहरात अनेक विकासात्मक आणि हायटेक प्रकल्प सुरू आहेत. यामुळे रत्नागिरीच्या सौंदर्यात भर पडत आहे. परंतु, या मोकाट गुरांनी शहराच्या सौंदर्यावर पाणी फिरवले आहे. मोकाट गुरे नव्याने सुधारण्यात आलेल्या रहाटाघर बसस्थानकात शिरून व्यावसायिक आणि प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहेत. काँक्रिटीकरणे काम सुरू आहे, तरी ही गुरे रात्री या काँक्रिटीकरणावर ठिय्या देतात. जिल्हा प्रशासन आणि पालिकेने लाखो रुपये खर्च करून चंपक मैदानात मोकाट गुरांसाठी निवारा शेड बांधली आहे. परंतु, ती आता शोभेची बाहुली बनली आहे. यंत्रणांकडून मोकाट गुरांबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत.