गेल्या काही महिन्यांपासून पाचल परिसरामध्ये मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याने दहशत पसरवलेली असताना आता गव्यांचा त्रास या परिसरामध्ये वाढला आहे. पाचल परिसरातील परूळे येथील शेतकरी मनोहर सावंत यांच्या बागेतील सुमारे पन्नासहून अधिक फळधारणा झालेल्या काजूची झाडे मोडून गव्यांनी नुकसान केले. सावंत यांना काजूच्या ऐन हंगामामध्ये हातातोंडाशी आलेले काजूचे पीक गेल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घाट परिसरातील जंगलामध्ये वावरणाऱ्या गव्यांचा तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. परूळे येथील शेतकरी सावंत यांच्या बागेतील सुमारे पन्नासहून अधिक काजूच्या फळधारणा झालेल्या झाडांची गव्यांच्या कळपाने मोडतोड केली.
सध्या काजू हंगाम सुरू झाला आहे. ओल्या काजूगरासह सुक्या बियांनाही चांगला दर मिळत असतानाच लागलेल्या काजू कलमांची गव्यांनी नासधूस केल्याने सावंत यांचे मोठे नुकसान झाले आहे. लहरी आणि अनियमित पाऊस, मजुरांची वानवा, खर्च अन् उत्पन्नाचा न बसणारा मेळ आदी विविध कारणांमुळे शेती धोक्यात आली आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानाचाही आंबा-काजू बागावरही परिणाम होत आहे. त्यामुळे चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये गव्यांच्या उच्छादाने भर घातली आहे. गव्यांकडून होणाऱ्या त्रासाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.