चिपळूण तालुक्यातील रस्ते विकासासाठी आणलेला निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. कळंबस्ते फाटा ते धामणंद रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे सरकार आणि लोकप्रिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिवाळीचे फटाके चक्क खड्यात फोडले आणि आपली नाराजी दाखवली. कळंबस्ते फाटा ते धामणंद रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
मागील अनेक वर्षांपासून रस्ता दुरूस्तीबाबत नागरिकांकडून मागणी सुरू असताना त्याकडे प्रशासनाचे दुलर्क्ष आहे. चिपळूण तालुक्यातील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. माजी सभापती शौकत मुकादम यांनी रस्ता दुरूस्तीबाबत आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींकडे मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यंदाची दिवाळी त्यांनी खड्ड्यात फटाके वाजवून साजरी केली. या वेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडिक, शिरीषदादा शिंदे, दीपक शिगवण, पांडुरंग पिलावरे, ह.भ.प. चव्हाण बुवा, हळदे, अमेय महाडिक, सौरभ महाडिक, विकास जोरवेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

