महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूरमध्ये सुरु करण्यात येणारा अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध आत्ता मावळत चालला आहे. प्रत्येक जण आता आपली वैयक्तिक मते मांडायला लागले आहेत. मागील अनेक वर्षापासून काही राजकीय पक्षांचा असणारा या प्रकल्पासाठीचा विरोध आत्ता विकासाचा विचार करून मावळत चालला आहे.
गुरुवारी राज्यसभेत केंद्र शासनाने अणुऊर्जेच्या सहा अणुभट्ट्या उभारण्यास तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. प्रत्येकी १,६५० मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार असून, एकूण ९,९०० मेगावॅट क्षमतेसह हे देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मितीचे ठिकाण ठरणार आहे.
राज्यसभेत एका प्रश्नाला जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तर दिले. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, सरकार फ्रेंच फर्म EDF सोबत प्रकल्प प्रस्तावावर पोहोचण्यासाठी तांत्रिक-व्यावसायिक चर्चा करत आहे, अशी माहिती त्यांनी या उत्तराद्वारे दिली आहे.
जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. आता यावरून राजकारण तापलेले दिसत असून, शिवसेनेकडून मात्र अद्याप या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यात आला आहे. जैतापूर प्रकल्पाचा कोकणाला काय फायदा मिळणार आहे हे प्रथम पाहावं लागेल. शिवाय, आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका हीच आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते नाम. उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीमध्ये असताना बोलत होते.
सामंत पुढे बोलताना म्हणाले की, यापूर्वी देखील शिवसेनेने हा प्रकल्प इथे होणार नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण, तरीही कोणताही निर्णय आम्ही स्थानिकांच्या विरोधात जाऊन घेणार नाही. त्यामुळे जर हा प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा असेल तर स्थानिकांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.