25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriमोकाट गुरे बांधणार चंपक मैदानात

मोकाट गुरे बांधणार चंपक मैदानात

पंधरा दिवसांमध्ये ज्यांना पाळण्यासाठी ही जनावरे हवी आहेत, त्यांना दिली जाणार आहेत.

शहरातील मोकाट गुरांवर अखेर उपाय काढला आहे. एक प्रयोग म्हणून सर्व मोकाट गुरे संस्थेमार्फत पकडून ती चंपक मैदानात बांधली जाणार आहेत. चारही बाजूंनी बॅरिकेड लावून प्रशासन चारा- पाण्याची व्यवस्था करणार आहे. पंधरा दिवसांमध्ये ज्यांना पाळण्यासाठी ही जनावरे हवी आहेत, त्यांना दिली जाणार आहेत; परंतु त्यावरही पोलिस प्रशासन नजर ठेवणार आहे. यामुळे मोकाट गुरांमुळे वाहनधारक आणि नागरिकांना होणारा उपद्रव थांबणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मोकाट गुरांमुळे वाहनधारक आणि नागरिक त्रस्त आहेत. मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यावर ही गुरे बसलेली असतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. पालिकेकडे कोंडवाडा नसल्याने गुरांना पकडण्याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी, जिल्हाधिकारी सिंह यांनी ही बाब पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तत्काळ उपाय काढण्यात आला.

सामंत म्हणाले, मोकाट गुरांबाबत आम्ही एक प्रयोग म्हणून संस्थेमार्फत ही गुरे पकडून चंपक मैदानात बांधणार आहोत. चारही बाजूने बॅरिकेट लावून त्यांना बांधून ठेवले जाईल. त्यांची देखभाल म्हणून चारा-पाणी दिले जाणार आहे. पंधरा दिवसात आम्ही आवाहन करून ज्यांना गुरे सांभाळण्यासाठी हवी आहेत त्यांना दिली जाणार आहेत; परंतु ती कत्तलखान्यात जाणार नाहीत ना याची खबरदारी घेतली जाणार आहे. पोलिस विभाग ज्यांना गुरे दिली जाणार आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. जर त्या ठिकाणी गुरांचा मालक आला तर त्याच्यावर काय कारवाई करायची याच्या सूचनाही पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular