प्रसिध्द मराठी अभिनेत्री आणि रसिक प्रेक्षकांची लाडकी ‘चंद्रमुखी’ असलेली अमृता खानविलकर नुकतीच रत्नागिरीत येऊन गेली. यावेळी तीने आरे-वारे, काळबादेवी तसेच बसणी गावाला भेट देऊन येथील लोककला, मासेमारी, कुंभारकाम यांची अत्यंत आत्मपयतेने माहिती घेतली. बसणीतील कलाकारांकडे तीने ‘नमन’ पहायची इच्छा केली, आणि लाडक्या ‘चंद्रा’ला नमन दाखविण्यासाठी साऱ्या कलाकारांनी नमानाचे बंद केलेले ‘कोठार’ पुन्हा खुले केले. पुन्हा तोंडाला पावडर लागली. गोमू सजली.. संकासूर सजला.. आणि मोठ्या हौशीने दणक्यात रावणही नाचला! आपल्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मराठी सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकताच रत्नागिरी दौरा केला. तीला अस्सल ग्रामीण कोकण अनुभवायचं होतं. ते आपल्या कॅमेऱ्यात टिपायचं होतं. इथली मासेमारी, इथल्या लोककला जाणून घ्यायच्या होत्या.
लोकांशी गप्पा मारायच्या होत्या. त्यासाठी ती प्रथम आरे-वारेत गेली. तीथे तीने मातीकाम अर्थात कुंभारकाम कसे करतात, हे जाणून घेतले. काळबादेवी या गावात तीने मासेमारी अनुभवली. त्यानंतर एका रात्री तीने बसणी या गावातील महालक्ष्मी नमन मंडळाच्या कलाकारांना भेट दिली. कलाकारांकडे तीने नमन पहायची इच्छा केली, तीच्या इच्छेला मान देत सारे कलाकार मोठ्या हौशीने तयारीला लागले. खरेतर पावसाचे दिवस.. त्यामुळे नमनाचा खेळ आटोपलेला. सारा बाडबिस्तरा कोठारात जमा झालेला. मात्र ‘चंद्रा’ला आपली ‘गोमू’ पहायचीय म्हटल्यावर सारे हातची कामे सोडून कामाला लागले.
पेटाऱ्यातला रावण बाहेर पडला. मृदुंगाला बोवण लागले. तलवारी लकाकल्या. चुरगळलेल्या कपड्यांना इस्त्री चढली, आणि ‘रवलनाथ महाराज की.. जय’ म्हणून नमनाला सुरूवात झाली. मृदुंग रंग भरू लागला. एक एक कलाकार कला सादर करू लागला. गोमू आली. संकासूर नाचू लागला. नटवा आला. सोंगे आली, नाचगाणी करू लागली, आणि अखेरीस लंकाधीश रावणही आला. अमृता हे पारंपारिक नमन पाहून बेहद्द खुश झाली. सिनेमातली ही ‘चंद्रा’ नमानातल्या ‘गोमू’च्या प्रेम तच पडली. यानंतर तीने कोकणची पारंपारिक लोककला नमन याविषयी अत्यंत आत्मीयतेने जाणून घेतले. तीला मनोज गावडे, मोहन धांगडे, दिपक लोगडे, संतोष नेवरेकर यांनी नमनाविषयी माहिती दिली, तर इतर सर्व कलाकारांनी कला सादर केली.