जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह २४ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे गोवंश हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ७ जुलैला नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली परवानगी न घेता मोर्चा काढून रास्ता रोको केला होता. माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राउळ यांच्यासह इतर २४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
जुलै महिन्यात एमआयडीसी रस्त्यावर गोवंशाचे अवशेष निदर्शनास आले होते. यानंतर रत्नागिरीत संतापाची लाट उसळली होती. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून संशयित आरोपींना अटक करण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून ७ जुलै २०२४ ला पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडोंचा जमाव होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नीलेश. राणे यांनी केले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जेलनाका येथे लोकांनी उत्स्फूर्त रास्ता रोको करत जवळपास चार तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती.
यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. आता मोर्चा काढून रास्ता रोको केल्याबद्दल पोलिसांनी नीलेश राणे, बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राऊळ यांसह सकल हिंदू समाज संघटनेच्या इतर २४ जणांवर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.